Tuesday, January 16, 2024

गोष्ट एका होलोकॉस्ट वीरांगनेची

होलोकॉस्ट म्हणजे मानवी इतिहासातील गेल्या शतकातील एक कृष्ण पर्व. जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ज्यू धर्मीयांवर अनन्वीत अत्याचार केले. केवळ जन्माने ज्यू म्हणून, करोडो लोकांना त्याने छळ छावण्यांमध्ये बंदीवान केले आणि लाखो लोकांची कत्तल केली. हिटलरच्या त्या क्रूर कालखंडात फार थोडे नशीबवान लोक वाचले, ज्यांना होलोकॉस्ट सर्वायवर म्हणून संबोधतात. जेंव्हा मला समजलं की त्यातून बचावलेल्या, आयरीन मिलर, आमच्या जवळच्याच वाचनालयात व्याख्यान देणार आहेत, (१२ डिसेंबर २०२३ रोजी) तेंव्हा ही संधी न दवडण्याचा मी निश्चय केला. त्या वेळी या घटनेचा आपल्या आयुष्यावर किती प्रभाव होईल याची मात्र मला कल्पना नव्हती. आज पर्यंत आपण अशा गोष्टी केवळ पुस्तकांमधे (The diary of Anne frank, The boy in striped pajamas) वाचल्या होत्या किंवा सिनेमांमधे (Schindlers list, The book thief, Life is beautiful, The pianist) पाहिल्या होत्या. पण प्रत्यक्षात अशा व्यक्तीला ऐकण्याचा प्रसंग दुर्मिळच.

वाचनालयाचा  हॉल, सर्व वयोगटातील उत्सुक श्रोत्यांनी खचाखच भरला होता. थोड्याच वेळानी आयरीनने प्रवेश केला आणि तिची गोष्ट सांगण्यास सुरवात केली. आयरीनचा जन्म पोलंड मधे एका सुखवस्तू कुटुंबामधे झाला होता. तिचे वडील कामगार चळवळीचे नेते होते, आई  गृहिणी होती, शिवाय तिला एक मोठी बहीण होती. असं त्या चौघांचे सुखी कुटुंब होतं. १९४०-४२ चा काळ असावा, जेंव्हा ती फक्त पाच वर्षांची होती आणि तिची बहीण आठ वर्षांची. हिटलरच्या वाढत्या प्रभावाच्या कहाण्या त्यांच्या पर्यंत पोहोचत होत्या, पण त्याची झळ अद्याप पोहोचली नव्हती.  परंतु अखेरीस जर्मनीने  पोलंडचा पराभव केला आणि नाझी फौजांनी त्यांच्या देशात प्रवेश केला. हळू हळू ज्यू लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या, ओळखीतील लोकांमार्फत त्यांच्या पर्यंत पोहोचत होत्या. त्यांचे शेजारी, नातेवाईक अचानक गायब व्हायला लागले. शेवटी तिच्या आई बाबांनी तिकडून पळून जायचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्यांच्या समोर कुठला पर्याय सुद्धा नव्हता. पोलंडच्या सीमेलगत असलेल्या रशिया मध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

रशिया तेंव्हा सोवियत संघ म्हणून ओळखला जात होता, शिवाय हिटलर ने अजून तिकडे आपला मोर्चा वळवला नव्हता. परंतु रशियन सैन्यानी त्यांना आपल्या हद्दीत शिरण्यास मज्जाव केला. त्यांना जवळपास दोन महीने “No man’s land” मधे वास्तव्य करावे लागले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर कालखंड होता. “No man’s land” म्हणजे दोन देशांच्या मधली जागा, जिच्यावर कोणा एका देशाचा अधिकार नाही. त्यांच्या सोबत अशी शेकडो माणसं होती, ज्यांनी आपला संसार आणि बायका पोरांसकट पोलंड मधून पलायन केले होते, पण त्या सर्व शरणार्थींना रशियाने आपली दारं बंद केली होती. एकतर बहुतेक लोकांनी नेसत्या वस्त्रानिशी पळ ठोकला होता, त्यामुळे कडाक्याच्या थंडीत वापरावीत असे योग्य कपडे त्यांच्या कडे नव्हते, शिवाय खाण्या पिण्याचे हाल होते, आणि उघड्यावर राहत असल्यामुळे वन्य श्वापदांचा धोका होता. अशा परिस्थितीत येणारा प्रत्येक दिवस कंठणे सुद्धा असह्य आणि अवघड होते.  शेजारच्या गावातील बायका दर आठवड्याला काही खायच्या गोष्टी घेऊन यायच्या, पण त्या बाजार किंमतीपेक्षा चढ्या भावाने विकायच्या. त्यामुळे सर्वांना त्या विकत घेण्यास परवडत नसे आणि बऱ्याच दिवशी रिकाम्या पोटी त्यांना गुजराण करावी लागे. त्या शिवाय छोट्या आयरीन ला मैलोन् मैल थंडीत चालल्यामुळे  हाता पायांना हिम बाधा (Frost bites) झाली होती. पण ती वेळ आपल्या जखमांना कुरवाळायची अथवा रडत बसायची नव्हती, हे त्या इवल्याश्या मुलीला कळले होते.

ते सर्वजण दाटीवाटीने कोंडाळं करून बसायचे, जेणेकरून त्यांना एकमेकाच्या शरीराची ऊब मिळत राहील.  तिची आई सांगत असे की, थोडी थोडी हालचाल करत राहा, एका जागी स्वस्थ बसू नका, नाही तर गारठून जाल. आयरीन तिच्या हिम बाधा झालेल्या पायानी जेवढी जमेल तेवढी हालचाल करत असे.  त्या वेळी अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यायला लागलं, पण काही घटना इतक्या हृदयद्रावक होत्या की त्यांच्या आठवणीने आजही आयरीनच्या अंगावर काटा येतो.  एकदा ती झोपली असता तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या चादरीमधे घुसायचा प्रयत्न करतंय. तिनं पाहिलं तर एक वृद्ध माणूस होता. पण ती इतक्या निद्रीतावस्थेत होती आणि क्षीण झाली होती की काही आवाज वा प्रतिकार न करता तशीच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी जेंव्हा तिला जाग आली, तेंव्हा तो माणूस तिला मृतावस्थेत आढळला. लोकं आता आजारी पडून हळूहळू मरायला लागली होती. त्या सगळ्यांमधे एक डॉक्टर सुद्धा होता. एकदा एक बाई आपल्या छोट्या बाळाला घेऊन त्याच्याकडे आली. तिच्या बाळाला दोन दिवसांपासून फणफणून ताप येत होता. तिने हातापाया पडून डॉक्टरला विनवण्या केल्या की काहीही कर, कोणतंही औषध दे, आणि माझ्या बाळाला बरं कर. पण त्या डॉक्टरनी तिला सांगितलं की, माझ्या कोणत्याही उपायाचा अथवा औषधाचा आता काहीच फायदा नाही, कारण तिचं बाळ अगोदरच दगावलं आहे.

अखेरीस त्यांनी निर्णय घेतला की, आपण असेच हातावर हात ठेऊन बसलो तर आपल्या सर्वांचा असाच दुर्दैवी अंत होईल. ते सर्वजण रशियाच्या सीमेवर तैनात सैन्यापुढे जाऊन उभे ठाकले. आणि त्यांनी आरडाओरडा, हुज्जत, गोंधळ घातला, अखेरीस मिन्नतवारी केली की कृपा करून आम्हाला आतमध्ये येण्यास परवानगी द्यावी. पण रशियन सैन्य काही बधेना. शेवटी ती बाई आपल्या बाळाचं कलेवर घेऊन आली आणि त्याचं प्रेत त्या रशियन अधिकाऱ्यांच्या पायाजवळ ठेवलं. पण त्या अधिकाऱ्याने त्या बाळाच्या प्रेताला निष्ठुरपणे लाथाडले आणि सांगितले की, जिथून आला तसेच परत जा. आयरीनच्या वडिलांनी शेवटी पुढाकार घेतला, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून, काहींना पैसे देऊन त्यांनी आपल्या कुटुंबाला रशिया मधे आणण्याची परवानगी मिळवली. परंतु त्यांना आपल्या सोबत केवळ दोन जणांना आणायची परवानगी मिळाली. म्हणून अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी आपल्या दोन्ही मुलीं सोबत रशियामध्ये प्रवेश केला, आणि बायकोला मागे ठेवले. मात्र आयरीनच्या वडिलांनी आशा सोडली नाही, प्रयत्नांची शर्थ केली, भरपूर लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, अनेकांना पैसे चारले आणि अखेरीस त्यांच्या बायकोच्या प्रवेशाचे कागद पत्र मिळवले. ताबडतोड ते पुन्हा No man’s land मधे पोहोचले, पण तिथे कोणाचा मागमूसही नव्हता. तिथल्या सैनिकांकडून बातमी समजली की, नाझी फौजा पुन्हा आल्या आणि त्यांनी उरल्यासुरल्या ज्यू लोकांना पकडून छळछावण्यात बंदिस्त केले.

आयरीनच्या मोठ्या बहिणीने आता तिच्या आईच्या भूमिकेत प्रवेश केला होता. जेंव्हा त्यांचे बाबा काम शोधायला घराबाहेर पडत, तेंव्हा ह्या दोघी बहिणी सुद्धा आजूबाजूच्या गावांमधे पडेल ते काम करायच्या. रोजच्या खाण्याची परवड होतीच, कधी कोणाला दया आली तर पावाचा तुकडा किंवा सूप द्यायचे, अन्यथा बरेच दिवस उपासमार घडायची. आपली आई पुन्हा भेटेल ही आशा त्यांनी सोडून दिली होती. आणि एक दिवस अचानक दरवाज्यावर ठक ठक झाली. त्यांनी दार उघडले तर काय, चक्क त्यांची आई दारात उभी होती. आयरीनचा तर स्वताच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती कशा पद्धतीने बचावली तो चमत्कारच होता, पण आत्तापर्यंतच्या खडतर प्रवासातला तो एक सुखद धक्का होता आणि अत्यंत आनंदाचा क्षण होता.  पुढचे अनेक दिवस आयरीन झोपेतून हळूच उठायची आणि आपली आई सोबत आहे का ते चाचपडून बघायची.

त्यांचे आई बाबा आता कामावर जायचे आणि या दोघी बहिणी घरातली कामं करायच्या. एवढ्यात त्यांना कळाले की रशियन सरकार आता काम करू शकतील अशा तरुण आणि मध्यमवयीन शरणार्थींना पकडून कुठल्यातरी अनोळखी ठिकाणी पाठवतंय. ही खबर लागताच त्यांचे आईबाबा त्या परिस्थितीतून काही मार्ग काढण्यासाठी त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलायला गेले. नेमकी तेंव्हाच रशियन सैनिक त्यांच्या घरी आले आणि ह्या दोन मुलींना गाडीत टाकून घेऊन आले एका रेल्वे स्टेशनवर, जिकडे त्यांच्या सारख्या हजारो शरणार्थींना आणले होते. गुरंढोरं वाहणाऱ्या मालगाडीतल्या एकेका डब्यात शेकडो लोकांना कोंबत होते. त्या दोघी खूप रडत होत्या, तिथल्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडत होत्या पण कोणीच त्यांचे ऐकत नव्हते. इतक्यात त्यांचे आईबाबा तिथे पोहोचले आणि सुदैवाने पुन्हा त्यांची ताटातूट झाली नाही. आता त्या सर्वांनाच मालगाडीमधे चढवण्यात आले.  बंद दाराच्या फटीतून जो काही उजेड येत होता तोच प्रकाशाचा एकमेव स्त्रोत होता. त्या अंधाऱ्या डब्यामधे बाकीच्या शेकडो लोकां सोबत न जाणो किती दिवस त्यांचा प्रवास चालू होता. शेवटी जेंव्हा गाडी थांबली तेंव्हा समजले की त्यांना साइबेरिया ला आणलंय. साइबेरिया मधे मनुष्य वस्ती करणं अशक्यप्राय होतं, एकतर तिकडे मरणाची थंडी होती, शिवाय अस्वलं, लांडगे यासारख्या जंगली प्राण्यांचा सुळसुळाट होता. एका तंबुवजा घरामधे ३, ४ कुटुंबं दाटीवाटीने रहायची. आणि जी कामं करायला रशिया मधील कोणी तयार नव्हतं ती कामं करण्यासाठी या शरणार्थींना इथे आणलं होतं. काही महीने तिकडे काबाडकष्ट केल्यावर त्यांना रशियाच्या दक्षिणेस उज़्बेकिस्तानला हलविण्यात आले.

उज़बेकिस्तानला आल्यावर निदान थंडीपासून सुटका झाली, म्हणून त्यांना थोडे हायसे वाटले. पण खाण्याच्या दुरावस्थेत भर पडली. काळसर पडलेले पावाचे तुकडे ज्यांना अनेकदा बुरशी लागली असे, ते खाऊन गुजराण करावी लागे. क्वचित त्यांना खायला बटाटे मिळत, आणि ती म्हणजे जणू काही त्यांच्यासाठी मेजवानी असे. आयरीनला असा एक प्रसंग आठवतो. त्या दिवशी आयरीनचा वाढदिवस होता. तिच्या आईने तिला जवळ घेतले आणि विचारले की समजा, हे युद्ध झालं नसतं तर आजच्या दिवशी वाढ दिवसाची भेट म्हणून तुला काय हवं? तिने क्षणभर विचार केला आणि सांगितलं की, मला एवढं श्रीमंत व्हायचंय की दर दिवशी मला बटाटा खायला मिळेल. ते ऐकताच तिच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा आसवं गळायला लागली, पण बिचाऱ्या आयरीनला कळेना की माझ्या बोलण्याने आईला इतकं वाईट का वाटावं. आयरीन सांगते की, आता ती रोज बटाटे खाते पण तशी चव आणि त्याची सर आता येत नाही.

१९४५ साली दूसरे महायुद्ध संपले, पण त्यांचे कुटुंब अद्याप रशिया मधेच अडकले होते, शेवटी काही वर्षांनी पोलंडचे दरवाजे पुन्हा त्यांच्यासाठी उघडले. दुर्दैवाने ह्या सर्व कालखंडातील मानसिक तणाव, शारीरिक यातना, उपासमार तिचे बाबा सहन करू शकले नाही आणि यातच त्यांना आपले प्राण गमवावे  लागले. आयरीनच्या आठवणीतील पोलंड म्हणजे धरती वरील स्वर्ग होता. पण प्रत्यक्षात तिथे आल्यावर पूर्वीसारखे काहीच शिल्लक नव्हते. सगळीकडे फक्त मातीचे, राखेचे ढिगारे, पडझड झालेली घरं, इमारती आणि सपाट झालेल्या युद्धभूमीवरील भग्नावशेष दिसत होते. युद्ध सुरू होण्यागोदर  त्यांचा शंभराहून अधिक मित्र परिवार आणि नातेवाईकांचा गोतावळा होता. पण आता फक्त आयरीन, तिची बहीण आणि आई एव्हढेच मागे राहिले होते. बाकी सर्वांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. युद्धविराम झाल्यावर आणि माय देशी परतल्यावर सुद्धा ज्यू धर्मीयांना मिळणाऱ्या हीन वागणुकीत फरक पडला नव्हता, उलट भरच पडली होती. हिटलर असो, स्टालिन असो अथवा त्यांची मायभूमी असो, त्यांची परिस्थिती सगळीकडे सारखीच होती.

तिच्या बहिणीचे शरणार्थी छावणीतील एका मुलावर प्रेम होते व नंतर त्यांनी लग्न केले होते. सर्व गोष्टी स्थिरस्थावर झाल्यावर चांगल्या भविष्याच्या शोधात त्यांनी इस्रायलला जाण्याचा निर्णय घेतला. आयरीन व तिची आई सुद्धा त्यांच्या मागोमाग इस्रायलला गेल्या. ह्या सर्व संघर्षादरम्यान आयरीनने एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे, नवनवीन गोष्टी शिकण्याची तिची आवड. युद्ध सुरू होते तोपर्यंत तिचे शालेय शिक्षण तर बंदच होते. पण तिनं नवीन कौशल्यं हस्तंगत करणं, नवीन भाषा आत्मसात करणं, नवीन ओळखी करणं कधी थांबवलं नाही. टिपकागदा सारखं जिथून ज्ञान मिळेल तिकडून ती ते मिळवत राहिली. म्हणूनच आणखी चांगली संधी, स्वतःची प्रगती आणि ज्ञानार्जन करण्यासाठी, ती अमेरिकेला आली. ते जेंव्हा रशियामधे आले तेंव्हा तिला रशियन भाषा येत नव्हती, जेंव्हा इस्रायलला आले तेंव्हा तिला हिब्रू भाषा येत नव्हती आणि ती जेंव्हा अमेरिकेला आली तेंव्हा तिला इंग्रजी भाषा येत नव्हती. तरी सुद्धा नानाविध संकटांना तोंड देत, न डळमळता, न घाबरता, जिद्दीने ती सर्व शिकली. अमेरिकेत सिनसिनाटी विद्यापीठातून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्याशिवाय तिने यशस्वीरित्या MBA चे शिक्षण पूर्ण केले. कमालीचा आशावाद, कधीही हार न मानण्याची वृत्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळेच ती आज इथवर पोहोचू शकली. ती खरोखर एक लढवय्या योद्धा आहे. आपल्या व नवीन पिढीसाठी आशास्थान आणि प्रेरणास्थान आहे.

प्रश्नोत्तराच्या तासाला मी तिला विचारले की, “ज्या लोकांनी तुमचा अतोनात छळ केला, अशी अधम कृत्यं केली आणि तुम्हाला ही अमानवी वागणूक दिली, त्यांच्या प्रति तुझ्या मनात राग, सूड, तिरस्कार, द्वेष, चीड ह्या भावना नाही का? तुझ्या बोलण्यातून ते प्रतित होत नाही. आणि असल्यास, कशा प्रकारे तू तुझ्या भावनांवर संयम राखतेस?” तिने अत्यंत सुंदर उत्तर दिले, ती म्हणाली की, “हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मी येणारा प्रत्येक क्षण संपूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगते. मला चांगलं खायला, चांगली पुस्तके वाचायला, चांगलं संगीत ऐकायला आवडतं. लहान मोठ्या सर्व वयोगटातील लोकांशी गप्पा मारायला, मैत्री करायला आवडतं. ज्या लोकांनी आमचा छळ केला, त्यांच्या मते आम्हाला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार नाही, आणि जिवंतपणी आम्हाला नरकयातना भोगायला लावणं हाच त्यांचा उद्देश्य होता. आज मी जर माझं आयुष्य इतकं सुरेख जगत असेन, तर हा सुद्धा माझ्या परीने मी त्यांच्यावर उगवलेला सूडच आहे. आजही मी जर तो तिरस्कार, द्वेष मनात बाळगून असते, तर त्या नकारात्मक भावना माझ्याच प्रगतीच्या आड आल्या असत्या. पण मी त्यांना माफ केलंय का? मला वाटतं एखाद्याला त्यानी केलेल्या पापाची शिक्षा देणारी अथवा माफ करणारी मी कोण? जर ह्या जगात देव असेल तर प्रत्येकाला त्यांनी केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मिळेलच, यावर माझा दृढ विश्वास आहे.”

खरोखर तिचा जीवनपट आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारा होता. जेंव्हा आयरीनचं व्याख्यान संपले, तेंव्हा माझ्या डोक्यात चक्रं फिरू लागली. आणि मी स्वतःच्या वागण्याचा विचार करू लागलो. आपण सतत आपल्या आईबाबांशी भांडतो, नवरा बायकोमध्ये सुद्धा छोट्या छोट्या कारणांनी वाद विकोपाला गेलेले आपल्या आजुबाजूला पाहतो. जेवताना एखादी भाजी आठवड्यातून दुसऱ्यांदा खावी लागली तरी कटकट करतो. शाळा, कॉलेज, किंवा ऑफिस मधे झालेल्या भांडणांचा राग आपल्या घरच्यांवर काढतो. हे तर सर्वज्ञात आहे की जगामधे भरपूर लोकं वंचित, कुपोषित, दारिद्र्यरेषेखाली आहेत. दर वेळी आपण त्यांना पैशाची मदत करणे शक्य नसले तरी अन्नाची नासाडी थांबवणे, अनावश्यक खर्च टाळणे, प्रदूषण न करणे, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवणे अशा अनेक छोट्या गोष्टींतून मदत करून आपल्या परिसराचे आणि परिजनांचे जगणे आपण सुसह्य करू शकतो.

आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो, नशीबाला बऱ्याचदा नावं ठेवतो पण आयरीनची गोष्ट ऐकल्यावर मला जाणवलं की आपण किती नशीबवान आहोत. निदान आपल्या डोक्यावर छप्पर आहे, निदान आपल्याला दोन वेळेस खायला मिळतंय, निदान आपल्याकडे एक घर आहे जिथे कोणीतरी आपली वाट बघतंय. परंतु खूप लोकांसाठी ही सुद्धा न परवडणारी चैन आहे, अनेकांसाठी ही वाढदिवसाची अनमोल भेट आहे, तर काहींसाठी ही मरणापूर्वीची अंतिम इच्छा आहे.

(C) कुलदीप चंद्रशेखर शेट्ये.

ता. क. : आयरीन मिलरचा मी शतःश ऋणी आहे. तुझा उत्साह, तुझी उमेद आणि जीवनलालसा या सर्वांना माझा मानाचा मुजरा.

संदर्भ:

१. Into no man’s land a historical memoir- by Irene Miller

२. Life lessons by a holocaust survivor- by Kuldeep Chandrashekhar Shetye [माझ्या आधी प्रकाशित केलेल्या या लेखाचा हा मराठी अनुवाद आहे.]

https://kuldeep866.wordpress.com/2023/12/26/life-lessons-by-a-holocaust-survivor/

No comments:

Post a Comment

छावा ची गर्जना दशदिशांत घुमेल

  ॐ नमः पार्वती पतये, हर- हर महादेव। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित    छावा हा चित्रपट पाहण्याचा योग आला. वास्...