ॐ नमः पार्वती पतये, हर- हर महादेव।
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट पाहण्याचा योग आला. वास्तविक चित्रपट पाहण्यासाठी मी थोड्या साशंक भावनेने गेलो होतो. कारण, संजय भन्साळी किंवा आशुतोष गोवारीकर सारख्या दिग्दर्शकांनी ऐतिहासिक चित्रपटांचा जो भ्रमनिरास केला, तसंच यावेळी सुद्धा होईल अशी धास्ती वाटत होती. पण लक्ष्मण उतेकरांचा प्रयत्न प्रामाणिक वाटला. अर्थात काही गोष्टी खटकल्या आणि काही गोष्टी अजूनही चांगल्या दाखवता आल्या असत्या. पण एकंदरीत चित्रपट आवडला, त्याचा प्रभाव पडला आणि ज्या कोणालाही हा इतिहास माहीत नसेल, आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी सुद्धा आवर्जून पाहायला हवा, असं वाटलं.
आधी चित्रपटातील न आवडलेल्या गोष्टी बघूया. चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत अतिशय विसंगत आणि दुय्यम दर्जाचे आहे. एकाही गाण्याला त्या काळच्या, मराठी अथवा भारतीय संस्कृतीचा लवलेश दिसत नाही. उलट मुघल/ मुसलमान संस्कृतीचा जास्त पगडा वाटतो. मुळात ऐतिहासिक चित्रपटांत गाणी अनावश्यक वाटतात, त्यातही जर कथानक त्यातून पुढे सरकत असेल तर असायला हरकत नाही. पण या चित्रपटात एकही गाणं असं नाही जे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर लक्षात राहील. “जाने तू, मेरी जान है तू” अशी गाणी जोधा- अकबर मध्ये चालून जातात पण इथे मात्र विसंगत वाटतात. ज्या संगीत दिग्दर्शकाने रोजा, बॉम्बे, साथिया, लगान, रंग दे बसंती, गुरू अशा एकापेक्षा एक दर्जेदार गाण्यांना संगीतबद्ध केले, त्या ए र रहमानने मात्र निराशा केली. त्याला ना सिनेमाचा भाव कळला, ना त्याची नस पकडता आली. जी गत संगीताची होती तीच पार्श्वसंगीताची. खरंतर ए आर रहमान माझा आवडता संगीतकार, स्वदेस सारखा चित्रपट पुन्हा पुन्हा त्याच्या पार्श्वसंगीतासाठी सुद्धा पाहता येईल. त्यातल्या प्रत्येक फ्रेमला जे पार्श्व संगीत दिले आहे ते सर्व संगीतकारांसाठी वस्तुपाठ आहे. पण या चित्रपटात मात्र त्यानं पाट्या टाकल्या आहेत. त्यापेक्षा बाहुबली फेम एम एम क्रीम किंवा अजय-अतुलने छान काम केले असते.
आणखी दोन गोष्टी खटकल्या, आणि त्या दोन्ही गोष्टींचे कारण एकच वाटते. एक म्हणजे चित्रपट सुरू होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर. त्यामुळे चित्रपटात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ते त्यांच्या दुर्दैवी मृत्यू पर्यंतचा काळ चित्रित केला आहे. परंतु त्यांचे आणि शिवरायांचे एकमेकांशी असलेले नाते आणि त्यांचे एकत्रित प्रसंग पाहायला मिळत नाहीत, ती चुटपूट लागून राहते. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात चार प्रमुख भूमिका आहेत, छत्रपती संभाजी महाराज, राणी येसूबाई, कवी कलश आणि औरंगजेब. पण त्या वगळता अन्य पात्रांच्या भूमिका विशेष लक्षात राहत नाहीत. त्यांच्या भूमिकेच्या आलेखाला इतका वाव मिळाला नाही. वास्तविक राणी सोयराबाई आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आणि अनेक कंगोरे असणाऱ्या आहेत. पण त्यांना सुद्धा पडद्यावर इतका वेळ मिळाला नाही. या दोन्ही गोष्टींचे कारण एकच वाटते, वेळेची मर्यादा. संभाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र दोन ते तीन तासांत चित्रबद्ध करणं अशक्य आहे. त्यासाठी स्वतंत्र मालिका बनवली पाहिजे. आणि मला आशा आहे की हिंदीतून सुद्धा ही मालिका सुरु करावी जेणेकरून अमराठी लोकांना सुद्धा आपला गौरवशाली इतिहास कळेल.
आता ज्या गोष्टी मला भावल्या त्या बघूया. सर्व प्रथम जी गोष्ट ऐतिहासिक सिनेमात कटाक्षाने पाळली पाहिजे ती म्हणजे योग्य आणि खरा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी उतेकरांचे नक्कीच कौतुक करावे लागेल. अनेक वेळा हिंदी चित्रपटात अनावश्यक ठिकाणी गाणी घुसवतात किंवा युद्ध आणि लढायांचे प्रसंग केवळ तोंडी लावण्यासाठी दाखवतात (बाजीराव मस्तानी) किंवा तद्दन खोटा इतिहास दाखवतात (जोधा अकबर). पण छावा मधे तसे नाही. विशेषतः जातीय आणि धार्मिक भावना न दुखावण्याच्या नादात सत्य घटनांवरही पडदा टाकला जातो. पण या सिनेमात काही प्रसंग येतात, जसे शंभूराजांविरूद्ध कट करणाऱ्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा असो किंवा शंभूराजांना जेरबंद केले असता औरंगजेब त्यांना धर्मपरिवर्तनाची लालूच दाखवतो, तो प्रसंग असो. काही दिग्दर्शकांनी या गोष्टी कदाचित वगळल्या असत्या पण इथे त्यांनी त्या लपवल्या नाहीत.
ऐतिहासिक सिनेमा म्हणजे युद्ध प्रसंग, लढाई दाखवणं ओघाने आलंच, पण ते किती चांगल्या पद्धतीने चित्रित करतात त्यावरून दिग्दर्शकाचं कौशल्य दिसतं. हॅालिवूडमधे 300, Braveheart, Gladiator, Troy, LOTR trilogy असे अनेक सुंदर चित्रपट आहेत ज्यातील युद्धप्रसंग पाहताना आपण अचंबित होतो. भारतीय चित्रपटांना त्यांची सर अजून आली नाही. त्यातल्या त्यात राजामौलींच्या चित्रपटात दुधाची तहान ताकावर भागते. छावा मधे संभाजी महाराजांच्या जीवनातील संघर्षमय कालखंड घेतला आहे त्या अनुषंगाने पुष्कळ लढाया पडद्यावर पाहायला मिळतात. त्यामधील सर्व लढाया छान झाल्या आहेत अशातला भाग नाही, बऱ्याच कृत्रिमही वाटतात पण काही उत्तम झाल्या आहेत. विशेषतः संगमेश्वरला झालेली अंतिम लढत जिथे फंदफितुरी आणि दगाफटक्याने शंभूराजांना धरले जाते, ती अप्रतिम आहे. ज्या पद्धतीने तो सर्व प्रसंग उभा केला आहे, तो पाहताना आपण त्या ठिकाणी आहोत असे वाटत राहते आणि आपण श्वास रोखून पाहू लागतो. त्यासाठी एक्शन डायरेक्टर, स्टंट डायरेक्टर, दिग्दर्शक आणि कलाकार सर्वांनी खूप मेहनत घेतलेली दिसते आणि एका उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन दिसते. (शिवाय आमच्या गावात भोरच्या राजवाड्यात त्याचे चित्रीकरण झाले, त्यामुळे सुद्धा विशेष आपुलकी आहे).
चित्रपटाची आणखी जमेची बाजू म्हणजे त्यामधील संवाद. शिवाजी सावंत यांच्या छावा ह्या मराठी कादंबरी वर हा चित्रपट आधारित आहे, आणि तो तेवढ्याच प्रभावीपणे हिंदी भाषेत मांडला आहे. त्यामधील भावार्थ योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात पटकथा लेखकाला आणि संवाद लेखकाला यश आले आहे. कादंबरी, नाटक आणि सिनेमा या तीन माध्यमातील प्रमुख फरक मला त्यांच्या शब्दांत किंवा संवादात दिसून येतो. सिनेमाचा कॅनव्हास मोठा असल्याने तुम्हाला संवादासोबत कृतीची जोड मिळते. त्यामुळे केवळ जड संवाद असले तर तो सिनेमा शब्दबंबाळ आणि कंटाळवाणा होऊ शकतो. म्हणूनच संवाद आणि कृतींचा योग्य समन्वय साधता आला तर चांगली भट्टी जमते जी या सिनेमात पाहायला मिळते अन्यथा त्याचा विचका होतो. छावा मधे प्रमुख संवाद संभाजी महाराज आणि कवी कलश या पात्रांच्या तोंडी आहेत. त्या खालोखाल औरंगजेब, येसूबाई, सोयराबाई, हंबीरराव आणि शहजादा अकबर यांच्या वाट्याला आलेले आहेत. केवळ रश्मिका मंदानाची संवादफेक थोडी खटकते कारण तिच्या बोलण्यातून दाक्षिणात्य हेल ऐकायला येतो, पण कधी कधी व्यावसायिक गणितं जुळवायला लोकप्रियतेला झुकतं माप दिलं जाते. पण बाकी सर्वांनी योग्य रीतीने संवादफेक केली आहे. सिनेमाचा शेवट त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. विशेष लक्षात राहते ती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मधली कवितांची जुगलबंदी. “तुम नमक नहीं चंदन हो कवि, तिलक हमारे माथें का” ही कविता ऐकताना अंगावर शहारे येतात आणि कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही.
पात्रनिवड ही चित्रपट निर्मितीतली महत्त्वाची प्रक्रिया आहे कारण कलाकारांची निवड योग्य नसेल तर काय होते त्याची बरीच उदाहरणे आहेत. जसं पानिपत मधे अर्जुन कपूर, पृथ्वीराज मधे अक्षय कुमार, किंवा आदिपुरुष साठी प्रभास अजिबात शोभले नाहीत, अन् लोकांच्या पसंतीस उतरले नाहीत, आणि ते सिनेमेही फ्लॉप झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करणे आवश्यक होते. आणि त्यासाठी विकी कौशल पेक्षा चांगला अभिनेता मिळाला नसता. चित्रपट पाहिल्यानंतर तर खात्रीच पटते की संभाजी महाराज म्हणजे तोच साकारू शकतो. विक्की कौशलचे विशेष कौतुक करावे लागेल. मुळात त्याचे बोलके पाणीदार डोळे, उंचीपुरी शरीरयष्टी, भरदार व्यक्तिमत्व आणि भाषेवर असलेले प्रभुत्व यामुळे तो या भूमिकेत चपखल बसतो. याअगोदरही त्याने विविध चरित्रभूमिका रेखाटल्या आहेत. पण सर्व भूमिकेत त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे आणि कोणतीही भूमिका एकासारखी दुसरी झालेली नाही. उरी मधला जोश, सॅम बहादूर मधली जरब, उधम सिंह मधली उत्कट देशभक्ती, आणि छावा मधला आवेश तितकाच तीव्रतेने तो आपल्या पर्यंत पोहोचवतो. तो सिंहाच्या घशात हात घालून त्याचे दात मोजू शकतो आणि त्याचा जबडा फाडू शकतो यावरही आपला विश्वास बसतो. ते सामर्थ्य तो त्याच्या अभिनयाने पटवून देतो. मृत्यूला सुद्धा हसत सामोरा जाणारा आणि मृत्यूच्या छायेतही शत्रूसैन्याच्या छातीत धडकी भरवणारा महानायक त्याने सुंदर रंगवला आहे. शिवाय अशी भूमिका बऱ्याचदा आक्रस्ताळी होऊ शकते आणि संवादांमधली सुस्पष्टता जाऊ शकते पण ती तशी न होण्याची दक्षता त्याने घेतली आहे. पत्नी सोबत असताना त्यांच्या नात्यातला स्नेह, सख्य किंवा आपल्या वरिष्ठ अथवा कनिष्ठ सहकारी वर्गाप्रति असलेली आदर, काळजी किंवा चिंता या भावना सुद्धा अपेक्षित हळुवारपणे त्याने साकारल्या आहेत.
या अगोदर आपण कोणालाही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या भूमिकेत स्वीकारले आहे. मग ते नाटकी, कृत्रिम अभिनय करणारे अमोल कोल्हे, शंतनू मोघे असो, निस्तेज डोळ्यांचा महेश मांजरेकर असो, गोल सुबोध भावे असो किंवा करारीपणा पेक्षा मग्रूरीचे भाव जास्त वाटणारा चिन्मय मांडलेकर असो. केवळ महाराजांचं चरित्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून या सर्वांना सुद्धा मराठी प्रेक्षकांनी सहन केलं. अगदी पूर्वीचे चंद्रकांत किंवा आत्ता गश्मीर महाजनी वगैरेंची भूमिका मी अद्याप पाहिली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण एव्हढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विकी कौशल सारख्या अभिनेत्याला या भूमिकेत पाहणं खूप सुखावह आहे. त्याखालोखाल अक्षय खन्नाने सुद्धा छान काम केलं आहे. त्याच्या वाटेला फार पल्लेदार, लंबेचौडे संवाद नाहीत. बहुधा त्याला मुद्दाम दिले नसावे कारण एक तर त्याला थोडं तोंड्यातल्या तोंडात बोलायची सवय आहे आणि औरंगजेबची प्रतिमा संभाजी महाराजांच्या तुलनेत खुजी वाटायला हवी या कारणाने (पद्मावत सारखी चूक टाळण्यासाठी). पण त्याने आपल्या बॉडी लैंग्वेजचा चांगला वापर केला आहे. औरंगजेबच्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेला बेरकीपणा, क्रौर्य, दुष्टता त्याने चांगली दाखवली आहे. शेवटी संभाजी महाराजांचे हाल हाल करून, त्यांना मारून सुद्धा स्वतःच मनाने पराभूत झालेला आणि खंगत गेलेला औरंगजेब त्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. विशेष लक्षवेधी कामगिरी विनीत कुमार सिंह याने कवी कलशच्या भूमिकेत केली आहे. त्याच्याकडे असलेला हजरजबाबीपणा, वाक्चातुर्य, लढाऊ वृत्ती, आणि अखेरच्या क्षणापर्यंत महाराजांना दिलेली साथ यामुळे ही भूमिका तशी भावखाऊ होती. पण त्याने सुद्धा प्रामाणिकपणे ती साकारली आहे. रश्मिका मंदानाने सुद्धा तिचा हेल वगळला तर ठीक काम केलं आहे. तिच्या पेहरावात आणि वावरण्यात एका स्वराज्याच्या राणीचा आवेश दिसतो. आणि तिच्या डोळ्यात आपल्या पतीविषयी असलेला आदर, काळजी आणि अभिमान व्यक्त होतो. दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा या मुरब्बी नटांनी देखील आपल्या वाटेला आलेले काम चोख पार पाडले आहे. तसेच अनेक मराठी कलाकारांची सुद्धा मावळे, सरदार, मंत्रीमंडळ अशा विविध भूमिकांसाठी वर्णी लागली आहे, आणि प्रत्येकाने ती योग्य पद्धतीने वठवली आहे.
एकूण सारांश हा सांगता येईल की, छावा हा काही सर्वगुण संपन्न चित्रपट नाही, पण हिंदी सिने सृष्टीच्या ऐतिहासिक पटाच्या यादीतील एक मैलाचा दगड (milestone) नक्कीच आहे. आणि या निमित्ताने मराठी किंवा भारताच्या अन्य प्रांतातल्या अशा दुर्लक्षित पण जाज्वल्य इतिहासाची माहिती चित्रपटाद्वारे (चांगल्या निर्मिती मूल्यांसकट) येत रहावी. इतिहासातील चुकांपासून आपण योग्य बोध घेऊ शकतो आणि त्या काळातील शौर्यगाथा आपणास आजही स्फुरण देतील आणि चांगल्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरतील.
(तळटीप- या निमित्ताने शिवाजी सावंत, विश्वास पाटील, बाबासाहेब पुरंदरे, रणजीत देसाई यांच्या सारख्या अनेक दिग्गज कादंबरीकारांना सुद्धा शतशः नमन, ज्यांनी आपल्याला हा अमूल्य ठेवा दिला आहे.)

Thoughtful & well written👍🏻. You have such a natural way with words, I loved your perspective and how deeply you analyzed everything. 👏🏻
ReplyDeleteThank you for your kind words, such feedback means a lot and encourages me to write more often.
DeleteWell written... Thanks for adding other cinema names for surrogate/reference to convey points.
ReplyDelete